सल्ला क्र. कृ. वि.के./०२/ २०२५ महिना : फेब्रुवारी
कृषि विषयक सल्ला
१. कृषिविद्या:
· ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात रुंद वाफा व सरी पद्धतीने तुषार सिंचना खाली करावी. TAG -७३, TAG -२४ , SB -११ या जातीचे एकरी ५० किलो बियाण्यास टायकोकोडर्मा ५ ग्राम रायझोबिम २५ ग्राम, पी एस बी २५ ग्रा. या जीवाण संवर्धनाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी .
· उन्हाळी तीळ पेरणी साठी शेत तयार करून घ्यावे .पेरणी साठी AKT-१०१, JLT -४०८ (फुले पूर्णा) किवा NT-११ या वाणांचा वापर करावा .पेरणी सोबत एकरी ८ किलो झिंक व सल्फर दिल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते .
· नोव्हेंबर महिन्यात पेरलेल्या बागायती गव्हास पेरणी नंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्ता, कांडी अवस्था व फुलोरा अवस्तेत ओलीत करावी.
· हरभरा पीक दाने भरण्याच्या अवस्थेत झिंक सल्फेट ०.२ टक्के (२० ग्राम / १० लि पाणी) ची फवारणी केल्यास दाने भरण्यास मदत होते.
२. उद्यानविद्या:
· संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदूरानुसार ताण पूर्ण झाल्यानंतर आडवी - उभी वखरणी करून हलके पाणी द्यावे. झाडाचे वयानुसार खते द्यावीत. १० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाचे झाड ५० किलो कंपोस्ट खत + ७ किलो लिंबोळी ढेप + ६०० ग्रॅम नत्र + ४०० ग्राम स्फुरद + ४०० ग्राम पालाश प्रति झाड देऊन दुहेरी बांगडी पद्धतीने ओळीत करावे.
· जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाचे आळ्यात पालापाचोळ्याचे २ ते ३ इंच जाड आच्छादन करावे.
· मृग बहाराचे संत्र्याची फळे तोडणीपूर्वी दहा ते पंधरा दिवसा आधी पाणी देणे बंद करावे नंतर पक्वतेनुसार काढणी करून व प्रतवारी करून विक्री करावी. विक्रीस तयार फळे १० ग्रॅम कार्बनडाझिम १० लिटर पाणी मिश्रणात बुडवून नंतर विक्रीस पाठवावी.
· आंबा मोहराचे तुडतुडे, फुलकिडे, कोळी व भुरी रोगापासून संरक्षण करण्यासाठी डीनोकॅप १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून मोहरावर गटूर पंपाने फवारणी करावी.
३. पिक संरक्षण :
· कापूस पिकाचा हंगाम डिसेंबर पर्यंत संपवून किड ग्रस्त बोंडा सहित पर्ह्याट्यांची सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी.
· कापसाची शेवटची वेचणी आटोपताच शेतात गुरे ढोरे व विशेषता शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. येणाऱ्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.
· हंगाम संपल्या बरोबर लगेच खोल नांगरणी करावी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष होऊन नष्ट होतील.
· कापूस साठवणूक व संकलन केंद्रे, जिनिंग मिल्स ई. ठिकाणी कापूस येण्यास सुरवात झाल्यापासून साफसफाई मोहीम राबवून नंतर चाळणीवरच्या अळ्या, कोष, कवडी व खराब कापुस्ची वेळोवेळी त्वरित विल्हेवाट लावावी व त्या परिसरात बिगर हंगामात पूर्णवेळ प्रक्तेकी १५ ते २० कामगंध सापळे लाऊन सापळ्यामध्ये अडकलेले पतंग नियमित नष्ट करावे.
· हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क ५ % ची फवारणी करावी. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रती एकर आणि इंग्रजी “T”आकाराचे ५० पक्षी थांबे प्रती हेक्टरी उभारल्यास कीड आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
· हरभरा पिकावर घाटे अळीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास (सरासरी १ अळी प्रती मीटर ओळीत किंवा ५ % घात्याचे नुकसान) शिफारस मात्रेत इमामेक्टीन बेण्झोएट ५ टक्के ३ ग्र. किंवा क्लोऱ्यानट्रानिलीप्रोल १८.५ टक्के २.५ मिली या रासायनिक किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· हरभरा पिकावर शेतामध्ये मररोग ग्रस्त झाडे दिसून येताच उपटून नष्ट करावीत. प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये, कार्बेंडाझिम १० ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाइल १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव असलेल्या शेतात तीन वर्षापर्यंत हरभऱ्याची लागवड करू नये.
· ज्या शेतामध्ये तूर पिकावर मररोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास तूर पिकाची काढणी करून जमीन खोल नांगरणी करून तापू द्यावी. रोग ग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करावे. एकाच शेतात तुरीचे पिक सतत घेणे टाळावे. तूर पिकानंतर ज्वारी पिकाची फेरपालट किंवा ज्वारीचे आंतरपीक फायदेशीर आले आहे.
· गहू पिकावरील मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० % १० मिली किंवा इमिडाक्लोप्रीड१७.८ % ४ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· कांदा पिकावरील फुलकिडींचा नियंत्रणासाठी ४० निळे चिकट सापळे प्रति एकर लावावे. तसेच शिफारशीत प्रोफेनोफोस १० मिली किंवा फिप्रोनील ५ % १० मिली या रासायनिक कीटक नाशकाची प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. पुढील फवारणी किडींचा प्रादुर्भाव बघून १५ दिवसांनी करावी.
· हळद पिकावरील करपा (लिफ स्पॉट) रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ओक्झीक्लोराईड २५ ग्राम किंवा हेक्झाकोनाझोल ५ % १० मिली किंवा कार्बेन्डॅझिम १० ग्राम ची फवारणी करावी.
· संत्रा झाडाच्या बुंध्यातून डिंक्याचा स्त्राव सुरु असल्यास झाडाच्या बुंध्यावर २ फुटापर्यंत बोर्डो पेस्ट ब्रशने लावावी. बोर्डो पेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना प्रक्तेकी ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही द्रावण एकत्र करून झाडाला पेस्ट लावावी. हि तयार केलेली पेस्ट १२ तासांच्या आत वापरावी.
· संत्रा झाडावर मृग बहराच्या फळांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसतो. कोळी प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे हळूहळू ते काळ्या रंगाचे होतात. स्थानिक भाषेमध्ये त्याला ‘लाल्या’ संबोधले जाते. कोळी नियंत्रणाकरिता, डायकोफॉल १.५ मि.लि. किंवा इथिऑन २ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूडीजी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
· लिंबूवरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी नोव्हॅल्युरॉन १ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
४. पशुसल्ला:
· शेळ्यांना फुफुसांचा दाह या रोगावर प्रतिबंधात्मक लस टोचून घ्या.
· बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून दुधाळ जनावरांचे संरक्षण होईल, या प्रमाणे गोठ्यात बदल करावेत. गोठ्यातील जमीन ऊबदार राहण्यासाठी आणि गोठा कोरडा राहण्यासाठी जमिनीवर वाळलेले गवत किंवा धान्याचा भुसा पसरावा. दोन ते तीन दिवसांनी आच्छादन बदलावे
· जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत व जनावरांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक पावडर लावा.
· लिव्हर फ्ल्युक रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून जनावरास जंताचे औषध पाजावे व पिण्यास नेहमी स्वच्छ पाणी द्यावे.
शेळी पालन आहार व्यवस्थापन
· शेळ्या-मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे शेळ्यांना वजनाच्या अर्धा टक्के किंवा १००-२५० ग्रॅम खुराक देणे गरजेचे आहे. शेळ्यांना ओला व सुका चारा दोन्ही देणे गरजेचे आहे. आहार नेहमी जास्त ऊर्जा निर्माण करणारा ठेवावा. कारण थंडीत शरीराचे तापमान नियमित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज भासते. आहारात बदल करताना हळूहळू करावा.
· मेढ्यांना आंत्रविषार व घटसर्प व गोट पॉक्स रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करून घ्या.
कुक्कुट पालन आहार व्यवस्थापन
· हिवाळ्यात कमी तापमानामुळे कोंबड्या जास्त खाद्य खातात, त्यामुळे त्यांच्या खाद्यात योग्य बदल करावेत. आहारात ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण वाढवावे (१०० किलो कॅलरीज प्रति किलो खाद्य) आणि प्रथिनांचे प्रमाण १ ते २ टक्के कमी करणे आवश्यक असते. खाद्यामध्ये अ, क आणि ई या जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढवावे.
५. गृहविज्ञान:
· हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ऋतूमध्ये कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य, दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात.
· हिवाळ्यामध्ये अधिक प्रमाणात भाज्या आणि फळांचं सेवन करावे. फळ आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा झाल्यास रोगप्रतिकारक वाढण्यास मदत मिळते.
· मशरूम युनिटला आद्रता आणि तापमान पाहून दोन ते तीन वेळेस पाणी स्प्रे करणे.
· परसबागेतील तण काढून आवशकते प्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.
· मशरूम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या थंडीच्या दिवसा मध्ये तापमान वाढवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी थोडा वेळ १०० wt चा लाईट लावावा.
६. विस्तारशात्र:
· बाजरी,नाचणी ज्वारी या भरड धान्याचा आहारामध्ये नियमित वापर करा.
· शेतकरी बांधवानी १८००-१२३-२१७५ किंवा १४४२६ या टोल फ्री नंबरवर फोन करून शेतीविषयक माहिती मिळवू शकता.
७. मृदा विज्ञान :
माती परिक्षणाचे सर्व यश परीक्षणासाठी घ्यावयाच्या मातीच्या नमुन्यावरच अवलंबून असते:
· मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणी पूर्वी घ्यावा.
· पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत माती नमुना घेऊ नये.
· माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.
· शेता मधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरी जवळ, पाण्याचेपाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.
मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे:
· मातीचा एका नमुन्या करिता सर्वसाधारणपणे २-८ एकर पर्यंत जमिनेचे क्षेत्र असावे, परंतु जमिनी मध्ये फरक असल्यास उदा. रंग, चढ-उतार, खडकाळपणा, निचराशक्ती. इत्यादी बाबींचा विचार करून जमिनीच्या फरकाप्रमाणे वेग वेगळा नमुना घ्यावा. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.
· एका हेक्टर मधून १५ ते २० ठिकाणची माती घ्यावी, मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी टिकासाच्यासाहाय्याने इंग्रजी (व्ही) आकाराचा खड्डा करावा हंगामी पिकासाठी २५ सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील मातीबाहेर काढून खड्डा मोकळा करावा.
· खड्ड्याच्या सर्वबाजूने सारख्या २-३ से. मी जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून, ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी.
· अशा तऱ्हेने प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एकाशेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत आणि पुन्हा समोरा समोरचे दोन भाग वगळावेत.
· अशा तऱ्हेने शेवटी अर्धा किलो ग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे.
· अशा प्रकारे तयार झालेले नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यापूर्वी त्यानमुन्याच्या पिशवी मध्ये शेतकऱ्याने खालील माहिती भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हेनंबर/ गटनंबर व मागील हंगामात घेतलेले पीक पुढील हंगामात घेत असणारी पिके.