सल्ला क्र. कृ.वि.के./0१/ २०२३ महिना : जानेवारी
कृषि विषयक सल्ला
1. कृषिविद्या:
· कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास गुलाबी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्यांचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होतो त्यामुळे फरदड घेणे शक्यतो टाळावे.
· हरभरा पिकामध्ये फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते म्हणून पिक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची (२०० ग्रॅम युरिया + १० ली पाणी) ची फवारणी करावी. तसेच बागायती हरभऱ्यास जमिनीच्या मगदूराप्रमाणे फुले येऊ लागताच व घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये ओलीत करावे.
· नोव्हेंबर महिन्यात पेरलेल्या बागायती गव्हास पेरणीनंतर साधारण १८ ते २० (मुकुटमुळे अवस्था), ३० ते ३५ (जास्तीत जास्त फुटवे अवस्था) ४५ ते ५० (कांडी अवस्था) ६५ ते ७० (फुलोरा अवस्था) दिवसांनी ओलीत करावे.
· ओलीताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात रुंद वाफा व सरी पद्धतीने तुषार सिंचनाखाली करावी. TAG 24 किंवा SB ११ या वानांचा वापर करून एकरी ५० किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम, रायझोबियम २५ ग्रॅम,पी एस बी २५ ग्रॅम या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
· उन्हाळी सोयाबीन घ्यावयाचे असल्यास ते फक्त बीजोउत्पादन या उद्देशानेच घ्यावे. पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात पर्यंत आटपून घ्यावी त्याकरिता शक्य झाल्यास सुवर्ण सोया,PDKV अंबा,MAUS-१५८,MAUS-६१२,, फुले संगम, फुले किमया या वाणाची निवड करावी.
2. उद्यानविद्या:
केळी:
· थंडीच्या दिवसात केळीच्या पानांच्या खालच्या बाजूस जांभळट रंगाच्या छटा दिसू लागतात. या छटा जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसू लागतात. यासाठी झिंक सल्फेटची ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी ) या प्रमाणात फवारणी करावी.
संत्रा:
· मृग बहाराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता फवारणी जिबरेलिक अॅसिड १ ग्रॅम अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०-५२-३४) किंवा डाय अमोनियम फॉस्फेट (१२-६१-०) किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.
· थंडीची तीव्रता वाढल्यास फळबागांचे थंडीपासून संरक्षण करा. त्यासाठी फळबागांना सायंकाळी पाणी द्या. तसेच बागेत रात्री शेकोट्या धुपत ठेवा. झाडाच्या खोडाभोवती खुरपणी करून 9 इंच जाडीचे वाळलेल्या पालापाचोळ्याचे आच्छादन करा.
3. पिक संरक्षण :
· कापूस पिकाचा हंगाम डिसेंबर पर्यंत संपवून किड ग्रस्त बोंडा सहित पर्ह्याट्यांची सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी.
· कापसाची शेवटची वेचणी आटोपताच शेतात गुरे ढोरे व विशेषता शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. येणाऱ्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.
· हंगाम संपल्या बरोबर लगेच खोल नांगरणी करावी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष होऊन नष्ट होतील.
· कापूस साठवणूक व संकलन केंद्रे, जिनिंग मिल्स ई. ठिकाणी कापूस येण्यास सुरवात झाल्यापासून साफसफाई मोहीम राबवून नंतर चाळणीवरच्या अळ्या, कोष, कवडी व खराब कापुस्ची वेळोवेळी त्वरित विल्हेवाट लावावी व त्या परिसरात बिगर हंगामात पूर्णवेळ प्रक्तेकी १५ ते २० कामगंध सापळे लाऊन सापळ्यामध्ये अडकलेले पतंग नियमित नष्ट करावे.
· हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क ५ % ची फवारणी करावी. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रती एकर आणि इंग्रजी “T”आकाराचे ५० पक्षी थांबे प्रती हेक्टरी उभारल्यास कीड आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
· हरभरा पिकावर घाटे अळीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास (सरासरी १ अळी प्रती मीटर ओळीत किंवा ५ % घात्याचे नुकसान) शिफारस मात्रेत इमामेक्टीन बेण्झोएट ५ टक्के ३ ग्र. किंवा क्लोऱ्यानट्रानिलीप्रोल १८.५ टक्के २.५ मिली या रासायनिक किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· हरभरा पिकावर शेतामध्ये मररोग ग्रस्त झाडे दिसून येताच उपटून नष्ट करावीत. प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये, कार्बेंडाझिम १० ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाइल १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव असलेल्या शेतात तीन वर्षापर्यंत हरभऱ्याची लागवड करू नये.
· ज्या शेतामध्ये तूर पिकावर मररोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास तूर पिकाची काढणी करून जमीन खोल नांगरणी करून तापू द्यावी. रोग ग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करावे. एकाच शेतात तुरीचे पिक सतत घेणे टाळावे. तूर पिकानंतर ज्वारी पिकाची फेरपालट किंवा ज्वारीचे आंतरपीक फायदेशीर आले आहे.
· गहू पिकावरील मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० % १० मिली किंवा इमिडाक्लोप्रीड१७.८ % ४ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· कांदा पिकावरील फुलकिडींचा नियंत्रणासाठी ४० निळे चिकट सापळे प्रति एकर लावावे. तसेच शिफारशीत प्रोफेनोफोस १० मिली किंवा फिप्रोनील ५ % १० मिली या रासायनिक कीटक नाशकाची प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. पुढील फवारणी किडींचा प्रादुर्भाव बघून १५ दिवसांनी करावी.
· हळद पिकावरील करपा (लिफ स्पॉट) रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ओक्झीक्लोराईड २५ ग्राम किंवा हेक्झाकोनाझोल ५ % १० मिली किंवा कार्बेन्डॅझिम १० ग्राम ची फवारणी करावी.
· संत्रा झाडाच्या बुंध्यातून डिंक्याचा स्त्राव सुरु असल्यास झाडाच्या बुंध्यावर २ फुटापर्यंत बोर्डो पेस्ट ब्रशने लावावी. बोर्डो पेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना प्रक्तेकी ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही द्रावण एकत्र करून झाडाला पेस्ट लावावी. हि तयार केलेली पेस्ट १२ तासांच्या आत वापरावी.
· संत्रा झाडावर मृग बहराच्या फळांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसतो. कोळी प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे हळूहळू ते काळ्या रंगाचे होतात. स्थानिक भाषेमध्ये त्याला ‘लाल्या’ संबोधले जाते. कोळी नियंत्रणाकरिता, डायकोफॉल १.५ मि.लि. किंवा इथिऑन २ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूडीजी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
· लिंबूवरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी नोव्हॅल्युरॉन १ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
4. पशुसल्ला:
शेळीपालन :- शेळ्या-मेंढ्यांमधील देवी
· हा पॉक्स विषाणूपासून शेळ्या-मेंढ्यांना होणारा अतीसंसर्गजन्य साथीचा आजार आहे. याचा प्रादुर्भाव जानेवारी-एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर आढळतो.
· मेंढ्यांकरिता शीप पॉक्स व शेळयांकरिता गोट पॉक्स लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. लसीची रोगप्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत जनावरांच्या शरीरामध्ये राहते. याकरिता तीन महिन्यांवरील सर्व शेळ्या, मेंढ्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यात दरवर्षी न चुकता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे.
· बाधित शेळ्या-मेंढ्यांच्या संपर्कात आलेला चारा, खाद्य तसेच मृत जनावरे जमिनीमध्ये पुरून किंवा जाळून विल्हेवाट लावावी.
· बाधित कळप किंवा शेळ्या-मेंढ्यांना किमान दीड महिना वेगळे ठेवावे.
· नवीन खरेदी केलेल्या शेळ्या-मेंढया किमान तीन आठवडे मूळ कळपामध्ये मिसळू नयेत.
· प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये मेंढ्यांचे स्थलांतर करू नये.
उपचार:
· लक्षणे आढळून आल्यास प्रथम आजारी जनावर कळपातून वेगळे करावे.
· आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. इतर जीवणूंचे संक्रमण टाळण्याकरिता पाच दिवस प्रतिजैविके व वेदनाशामक औषधोपचार करावा.
5. गृहविज्ञान:
· परसबगेला पाणी व्यवस्थापन करावे.
· मशरूम लागवड झाल्यानंतर २० दिवसांनी मशरूम बेड ला पिंहेड्स आल्यावर पाणी स्प्रे करावे.
· मशरूम लागवड केलेल्या शेडमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसू नये यासाठी प्रति लिटर १ एम एल फॉर्मलिंची फवारणी करावी तसेच शेडची स्वच्छता ठेवावी.
· थंडीच्या दिवसांमध्ये मशरूम शेडमध्ये तापमान व आद्रता याचा समतोल राखणे.
6. विस्तारशात्र:
· शेती कामात व्यस्त असणाऱ्यांनी वैयक्तीक स्वच्छता आणि ४-५ फुट सामाजिक अंतर ठेवावे.
· एकाच दिवशी जास्त लोकांची व्यस्तता टाळा. यांत्रिकीकृत कामाला प्राधान्य द्या.
· सर्व शेती संबंधित यंत्र आणि पॅकेजिंग साहित्य निर्जंतुक करावे.
· बाजरी,नाचणी ज्वारी या भरड धान्याचा आहारामध्ये नियमित वापर करा
**********