सल्ला क्र. कृ. वि.के./ 0५/ २०२५ महिना: मे
१. कृषिविद्या:
· भुईमुंगाच्या शेंगा भरणाच्या अवस्थेमध्ये आकार व वजन वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोट्याश (००:००:५०) किंवा पोट्याशीयम नायट्रेट (१३:००:४५) ८० ग्राम अधिक मल्टीमायक्रोनुट्रीयंट ५० ग्राम प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
· उन्हाळी भुईमुंग पिकास गरज असल्यास जमिनिच्या मगदुरानुसार ६ ते ८ दिवसांचे अंतराने ओलित करावे. पाणी देताना तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. शक्यतो सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. गरज असल्यास ओलावा टिकविण्यासाठी गवताचे आच्छादन पसरवावे. भुईमुंग पिकाची काढणी साधारनपणे झाडावरील ७५ ते ८० टक्के शेंगा पक्व झाल्यावर करावी.
· गव्हाचे काड शेतात जाळू नये. नांगरणी किंवा रोटावेटरने ते जमिनीत गाडावे.
· खरीप हंगामातील कपाशीचे अवशेषात डोमकळी, वाळलेली बोंडे, कपाशीचे इतर अवशेष शेळ्या मेंढ्या चारून नष्ट करा. उन्हाळी खोलनांगरणी करून जमीन तापू द्यावी. पिकाची फेरपालट करावी.
· खरीप हंगामाची पूर्वतयारी करत असताना माती परीक्षण, पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा वापर, पिकाचे नियोजन, जमिनीचा प्रकार, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करूनच खरीप हंगामातील पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
· कोरडवाहू कपाशी पिकाकरिता तीन वर्षांतून एकवेळ व बागायती कपाशी करिता जमिनीच्या मगदुरानुसार २०-२५ सें.मी खोल नांगरणी करावी.
· सोयाबीन पिकाची मशागत करताना (नांगरणी, वखरणी) समतोल किंवा मुख्य उताराला आडवी करावी. त्यामुळे जमिनीची धूप कमी होऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरेल. सोयाबीन करिता जमिनीची १५ ते २० सें.मी खोल नांगरणी तीन वर्षातून एकदा समपातळीत करावी.
· तृणधान्य (ज्वारी, बाजरी, मका) तसेच कडधान्य (तूर, मूग, उडीद) पिकांकरिता मध्यम ते खोल भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हाळ्यात वखराच्या दोन ते तीन खोल पाळ्या देऊन जमीन चांगली पूर्व मशागत करावी.
· नांगरणी व सेंद्रिय खते टाकण्यापूर्वी शेतामधील मातीचे प्रातिनिधिक नमुने कृषी विज्ञान केंद्र किंवा मृदा परीक्षण प्रयोग शाळेत माती परीक्षणा करिता पाठवावे.
२. उद्यानषिद्या:
· खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास ती या महिन्यात पूर्ण करावीत. उदा. नांगरणी, ढेकळे फोडणी, कुळवणी इत्यादी.
· नवीन फळबाग लागवड करावयाची असल्यास फळबागेच्या प्रकारा प्रमाणे योग्य अंतरावर आखणी करून ०३ x ०३ x ०३ फुट आकाराचे खड्डे करून उन्हामध्ये चांगले तापू द्यावे
· संत्रा पिकावर आंबिया बहराची फळे असल्यास ती टिकून राहण्यासाठी बगीच्यात पाण्याच्या पाळ्या ४ ते ५ दिवसाच्या अंतराने सुरु ठेवाव्या कारण या महिन्यात उष्णतामान जास्त राहते.
· ठिबक संच असल्यास संत्रा व मोसंबी च्या १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या झाडांना अनुक्रमे ११ ते ३५, ४२ ते ६१ व ७३ ते १०८ लिटर पाणी प्रती दिवस संध्याकाळी द्यावे. त्याच प्रमाने लींबु च्या १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या झाडांना अनुक्रमे १७ ते ७४, १०२ ते १६६ व १८७ ते २३५ लिटर पाणी प्रती दिवस संध्याकाळी द्यावे.
· जुन मध्ये मृग बहार घेण्याकरिता संत्रा बगीच्याना जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचा तान द्यावा.
· हळद लागवडी साठी पूर्वमशागतीची कामे करून घ्यावी. त्यासाठी जमिनीची ट्रॅक्टर ने १८ ते २२ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून. जमिनीमधील कुंदा, लव्हाळ यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी परत संपूर्ण ढेकळे फोडून घ्यावीत आणि ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.
· हळद पिकात बियाणेप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बियाणेप्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर लागवडीच्या अगोदर जिवाणू संवर्धकाची बियाणेप्रक्रिया करावी. यासाठी ॲझोस्पिरिलम २५० ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्यामध्ये १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. बियाणेप्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.
३. पिक संरक्षण :
कीड व रोग नियंत्रण संदेश:
· कपाशीची शेवटची वेचणी नंतर शेतातील पऱ्ह्याटीचे रोटावेटर सारख्या यंत्रा द्वारे लहान लहान तुकडे करून शेतात गाडने किंवा त्याचा वापर शेताबाहेर कंपोष्ट तयार करण्यासाठी उपयुक्त करणे .
· रब्बी पिके निघालेल्या शेताची त्वरित खोल नांगरणी करणे त्यामुळे जमिनीतील घातक बुरशी, लपलेली कोष आणि अळ्या उन्हाने किंवा पक्षांचे भक्ष होऊन नष्ट होतील .
· कापूस पिकाची पूर्व हंगामी (मे महिण्यामध्ये) लागवड करू नये .
· नत्र खतांचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो . म्हणून जास्त नत्र खताचा वापर न करता माती परीक्षण करून घेणे व त्या नुसार शिफारसी मध्ये खतांची मात्रा द्यावी .
· कडुनिंबाच्या निंबोळ्या जास्तीत जास्त गोळा कराव्यात. जेणे करून हंगामामध्ये गोळा केलेल्या निंबोळ्यांचा उपयोग घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करण्यासाठी करता येईल.
· भुईमूंग पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी म्यांकोझेब २५ ग्राम किंवा कार्बेनडाझीम १० ग्राम किंवा टेबुकोनाझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे .
· भुईमूंग पिकावरील तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनाझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे तसेच शेंडेमर (बड नेक्रोसिस) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडीद्वारे होतो. रोगप्रसार करणाऱ्या फुलकिडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट १० मिली किंवा लंबडा सायलोथ्रीन ५% प्रवाही ६ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी .
· आंबा फळधारणा आणि फळ पिकाच्या अवस्थेत असतांना फळमाशीची मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या गरावर उपजीविका करतात. या किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. झाडाखाली जमीन नांगरावी. तसेच फळ माशीच्या नियंत्रणासाठी मिथिल युजेनॉल युक्त कामगंध सापळे बागेमध्ये एकरी ८-१० याप्रमाणे लावावे.
· झाडावरील फांद्या कापणी करतांना, कैचीला सोडियम हायड्रोक्लोराईड १ - २ % द्रावणामध्ये बुडवून निर्जंतुकीकरण करावे. झाडांच्या बुंद्यावर ६० सें. मी. पर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशनी लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्या करिता १ किलो मोरचूद ५ ली. पाण्यात व १ किलो. चुना ५ ली. पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून १२ तासांच्या आतमध्ये पेस्ट वापरावी.
· संत्रा झाडांच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्त्राव सुरु असेल असा भाग तीक्ष्ण चाकूने खरडून त्या ठिकाणी मेटॅलिक्झिल एम ४%+मॅन्कोझेब ६४% किंवा फोसेटील आम्लाची पेस्ट लावावी.
· फायटोफथोरा ग्रस्त झाडावर मेटॅलिक्झिल एम ४%+मॅन्कोझेब ६४% २. ५० ग्राम किंवा फोसेटील २.५ ग्राम + १ लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे व हे द्रावण झाडभोवतीही टाकावे .
· खोडकिडा किंवा साल खाणारी अळीच्या बंदोबस्ता करीता, अळीच्या छिद्रावरून जाळे काढावे व पिचकारीच्या मदतीने क्लोरोपायरीफॉस २०%५ मी.ली. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून छिद्रात टाकावे आणि कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे.
· संत्रावर्गीय झाडांवर सिट्रस सायलाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८% एस. ल. ५ मिली किंवा डायमिथोएट ३०% प्रवाही १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.
४. पशुसल्ला:
सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे. उष्मघातापासून जनावरांना वाचविण्याच्या उपाय योजना:
पशुसंवर्धन:
· जनावरांना थंड पाणी आणि चांगल्या प्रकारचा निवारा उपलब्ध करून दयावा.
· कमीत कमी तंतुमय पदार्थ असणारी वैरण जनावरांना खाऊ घालावी. जेणेकरून पचन संस्थेवर ताण येणार नाही. त्यासाठी क्रूड प्रथिनांचे प्रमाण वाढवावे.
· आहारात खनिज मिश्रणाचा व अ,ड,ई, जीवनसत्वाचे प्रमाण वाढवावे.
· ६० ते ७० टक्के पशुखाद्य हे रात्रीच्या वेळी आठ ते सकाळी आठ पर्यंत दयवित.
· उन्हाच्या वेळेस जनावरांना चरावयास सोडू नये. व लांब वाहतूक टाळावी. उष्माघात ग्रस्त जनावरांचे अंग थंड पाण्याने ओले करावे, जेणेकरून तापमान कमी होईल. पिण्यासाठी भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे, चघळण्यास बर्फ द्यावा, जनावरांच्या डोक्यावर बर्फाने शेकावे, पशुवैद्यकांच्या सल्ल्याने ग्लुकोज सलाईन द्यावे.
शेळीपालन:
· उष्मघातांपासून वाचविण्यासाठी शेळ्यांना थंड व हवेशीर ठिकाणी ठेवावे. थंड पाणी पाजावे व गरज भाजल्यास पायावर, मानेवर, पाठीवर पाणी शिंपडावे.
· शेळ्यांची दाटीवाटी किंवा गर्दी कमी करावी.
· खाद्यातून शेळ्यांना क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे द्यावे.
· लहान करडांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी.
कुकुटपालन:
· उष्मघातावर मात करण्यासाठी आहारातील समतोल राखणे गरजेचे आहे. मात्र उन्हाळ्यात दिवसामध्ये कोंबड्याच्या खाद्यामध्ये अचानक पणे बदल करू नये.
· कोंबड्यांना स्वछ, थंड व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
· शेडमधील पिण्याच्या पाण्याची भांडी वाढवावी.
· शेडमध्ये पक्षांची अधिक गर्दी असेल तर पक्षांची घनता कमी करावी.
५. गृहविज्ञान:
· ज्या ठिकाणी परसबाग तयार करायची आहे ती जमीन उखरी करून तापू दया.
· जून महिन्याच्या सुरवातीला हळद लागवड केली जाते हळद लागवड करण्यासाठी उकरी यंत्रचा वापर करावा.
· बियाणे लागवड करताना सुलभा बॅगचा वापर करावा.
· मशरूम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी गव्हाचे व सोयाबीन (उन्हाळी) चे कुटार कोरड्या जागी साठवून ठेवावे.
· धान्य साठवणूक करतांना सुपर ग्रेन बँग चा वापर करावा.
६. विस्तारशात्र:
· शेतकरी बांधवानी १८००-१२३-२१७५ किंवा १४४२६ या टोल फ्री नंबरवर फोन करून शेतीविषयक माहिती मिळवू शकता.
७. मृदा विज्ञान :
माती परिक्षणाचे सर्व यश परीक्षणासाठी घ्यावयाच्या मातीच्या नमुन्यावरच अवलंबून असते:
· मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणी पूर्वी घ्यावा.
· पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत माती नमुना घेऊ नये.
· माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.
· शेता मधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरी जवळ, पाण्याचेपाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.
मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे:
· मातीचा एका नमुन्या करिता सर्वसाधारणपणे २-८ एकर पर्यंत जमिनेचे क्षेत्र असावे, परंतु जमिनी मध्ये फरक असल्यास उदा. रंग, चढ-उतार, खडकाळपणा, निचराशक्ती. इत्यादी बाबींचा विचार करून जमिनीच्या फरकाप्रमाणे वेग वेगळा नमुना घ्यावा. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.
· एका हेक्टर मधून १५ ते २० ठिकाणची माती घ्यावी, मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी टिकासाच्यासाहाय्याने इंग्रजी (व्ही) आकाराचा खड्डा करावा हंगामी पिकासाठी २५ सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील मातीबाहेर काढून खड्डा मोकळा करावा.
· खड्ड्याच्या सर्वबाजूने सारख्या २-३ से. मी जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून, ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी.
· अशा तऱ्हेने प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एकाशेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत आणि पुन्हा समोरा समोरचे दोन भाग वगळावेत.
· अशा तऱ्हेने शेवटी अर्धा किलो ग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे.
· अशा प्रकारे तयार झालेले नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यापूर्वी त्यानमुन्याच्या पिशवी मध्ये शेतकऱ्याने खालील माहिती भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हेनंबर/ गटनंबर व मागील हंगामात घेतलेले पीक पुढील हंगामात घेत असणारी पिके.
**********